बुलढाणा जिल्ह्यातील मागासवर्गीयांचा निधी व शेतकरी प्रश्नांवर RPI (आठवले) गट आक्रमक
बुलढाणा जिल्ह्यातील मागासवर्गीयांचा निधी व शेतकरी प्रश्नांवर RPI (आठवले) गट आक्रमक
बुलढाणा : अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला निधी इतर विभागांकडे वळवू नये, तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी मंजूर निधी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शैक्षणिक सुविधा, कौशल्य विकास, रोजगार व आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. हा निधी इतर विभागांकडे वळविणे तात्काळ थांबवून यापूर्वी वळविण्यात आलेला निधी पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी RPI (आठवले) गटाने केली. पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान, उत्पादनातील घट आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
दुष्काळसदृश परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई, पीकविमा, दुष्काळी सवलती व आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. तसेच पिकांचे प्रत्यक्ष पंचनामे करून पात्र लाभार्थ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी विजय साबळे, राहुल गवई, अमोल गवई, सुनील आरख आणि दीपक झिने यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. अनुसूचित जाती-जमातींचा विकासनिधी आणि शेतकरी कल्याणासाठी मंजूर निधी अन्यत्र वळविला जाऊ नये, याबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली.
मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास RPI (आठवले) गटाच्या वतीने लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

संपादक : राहुल गवई
