सिंदखेडराजा पंचायत समितीतील प्रलंबित तक्रारींची चौकशी करा! गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; भाई संदीप इंगळे यांची वरिष्ठांकडे तक्रार
सिंदखेडराजा पंचायत समितीतील प्रलंबित तक्रारींची चौकशी करा!
गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; भाई संदीप इंगळे यांची वरिष्ठांकडे तक्रार
बुलढाणा : सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींचे वेळेत निवारण होत नसल्याचा, तसेच तक्रारदारांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप करत भाई संदीप इंगळे यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. राजेगाव येथील तक्रारीवरील कार्यवाही, संजय गवळी यांच्या तक्रारीची सद्यस्थिती आणि विस्तार अधिकारी श्री. पवार यांच्या दीर्घकालीन एकाच ठिकाणी नियुक्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांकडून विविध समस्यांबाबत लेखी तक्रारी सादर केल्या जातात. मात्र, या तक्रारींवर वेळेत कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे इंगळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. नागरिकांनी वारंवार कार्यालयात जाऊन विचारणा करूनही त्यांना समाधानकारक माहिती मिळत नसेल, तर त्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
राजेगावच्या तक्रारीवर कार्यवाहीची मागणी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजेगाव येथील एका प्रकरणासंदर्भात तक्रार देण्यात आली होती. मात्र, या तक्रारीवर आजपर्यंत नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित तक्रारीची नोंद, त्यावरील कार्यवाही आणि सद्यस्थिती यांचा सविस्तर अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे.
संजय गवळी यांच्या तक्रारीचे काय झाले?
संजय गवळी यांनीही संबंधित प्रकरणात तक्रार दाखल केली असून, लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाच्या निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्याचे सांगण्यात येते. असे असूनही तक्रारीचे निवारण झाले नसल्यास त्यामागील कारणे तपासून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी भाई संदीप इंगळे यांनी केली आहे.
विस्तार अधिकारी पवार यांच्या नियुक्तीची चौकशी करण्याची मागणी
सिंदखेडराजा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी श्री. पवार हे सुमारे दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती समोर येत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्या नियुक्तीचा आणि पदस्थापनेचा कालावधी सेवा अभिलेखांच्या आधारे तपासण्यात यावा. तसेच संबंधित प्रशासकीय नियमांचे पालन झाले आहे किंवा नाही, याची पडताळणी करून नियमानुसार योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील पाच वर्षांतील तक्रारींचे अभिलेख तपासण्याची मागणी
सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये मागील तीन ते पाच वर्षांत प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या, निकाली काढलेल्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे, प्रत्येक तक्रारीवर झालेली कार्यवाही आणि विलंबाची कारणे यांची सविस्तर तपासणी करण्यात यावी, असे इंगळे यांनी म्हटले आहे.
प्रलंबित तक्रारींच्या चौकशीसाठी पंचायत समितीबाहेरील सक्षम वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तक्रारदारांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती, झालेली कार्यवाही आणि विलंबाची कारणे लेखी स्वरूपात कळवावीत. तसेच तक्रारींचे निवारण करण्यात निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार
ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या समस्यांच्या निवारणासाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांची केवळ विचारपूस न करता तक्रारींचे अभिलेख तपासून निष्पक्ष चौकशी करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी भाई संदीप इंगळे यांनी केली आहे.
निर्धारित कालावधीत योग्य कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ प्रशासकीय प्राधिकरणाकडे तसेच उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणेकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संपादक : राहुल गवई
