शिक्षण-प्रशिक्षण

गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत माता-पिता व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त


गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत माता-पिता व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त

 

कोलवड : “माता, पिता, गुरु, देव” या भारतीय संस्कृतीतील पवित्र विचाराला साकार रूप देत शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठ स्कूल, कोलवड येथे गुरुपौर्णिमा उत्साह, भक्तिभाव आणि कृतज्ञतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने, प्राचार्य प्रमोद मोहरकर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर बी. मोहरकर, पर्यवेक्षक भगवत डी. उबाळहंडे, समन्वयक कल्पना आर. जाधव, अर्चना भालेराव, विद्या डोटोंडे आणि प्रीती पैठणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सौ. सविता काळे व सौ. पुष्पा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वर्गशिक्षक आणि शाळेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे औक्षण करून त्यांच्या चरणांचे पूजन केले, पुष्प अर्पण करत आशीर्वाद घेतले. या भावनिक उपक्रमातून “आई-वडील हेच मुलांचे पहिले गुरु” असल्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे, पुष्पगुच्छ आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या प्रार्थना सभेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

 

या उपक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसरात संस्कार, आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करणारे वातावरण निर्माण झाले. पालक मुलांच्या जीवनाचा भक्कम पाया रचतात, तर शिक्षक ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शनातून त्यांच्या उज्ज्वल भविष्याची घडण करतात, हा संदेश विद्यार्थ्यांच्या कृतीतून प्रभावीपणे पोहोचला.

 

कार्यक्रमाच्या शेवटी माता-पिता व गुरुजनांप्रती आयुष्यभर आदर, नम्रता आणि कृतज्ञतेची भावना जपण्याची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *