शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी कट-ऑफची अट रद्द; नवीन धोरण ठरविण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी कट-ऑफची अट रद्द; नवीन धोरण ठरविण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
| प्रतिनिधी
शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटी/सीटीईटी पात्रता १ सप्टेंबरपूर्वी मिळवणे बंधनकारक ठरविणारे शिक्षण संचालकांचे १४ मे २०२६ चे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केले आहे. न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत नवीन आणि सुसंगत धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने स्पष्ट केले की, टीईटी/सीटीईटी ही पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता असली तरी ती शिक्षकांच्या ज्येष्ठतेवर परिणाम करत नाही. ज्येष्ठता आणि पात्रता या स्वतंत्र बाबी असून केवळ टीईटी उशिरा उत्तीर्ण झाल्यामुळे शिक्षकाला वरिष्ठ शिक्षकांपेक्षा पुढे स्थान देता येणार नाही.
अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला. न्यायालयाने १ सप्टेंबरची कट-ऑफ तारीख लावण्यास कायदेशीर आधार नसल्याचे नमूद केले.
तसेच, राज्यभर पदोन्नती प्रक्रिया एकसमान पद्धतीने राबविण्यासाठी शासनाने २ ऑगस्ट २०१९ च्या निर्णयाचा फेरविचार करून नवीन धोरण जाहीर करावे, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
दरम्यान, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आधीच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्या प्रक्रियेवर या निर्णयाचा परिणाम होणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
– शिवसाई दर्पण न्यूज

संपादक : राहुल गवई
