शिवसाई ज्ञानपीठ शाळेत कवी-शिक्षक संदीप राऊत यांची प्रेरणादायी मुलाखत संपन्न
शिवसाई ज्ञानपीठ शाळेत कवी-शिक्षक संदीप राऊत यांची प्रेरणादायी मुलाखत संपन्न
बुलढाणा, दि. १७ जुलै : शिवसाई ज्ञानपीठ शाळा, बुलढाणा येथे विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध कवी व शिक्षणतज्ज्ञ संदीप राऊत सर यांची प्रेरणादायी मुलाखत आयोजित करण्यात आली. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग नोंदविलेल्या संदीप राऊत सरांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत साहित्य, कविता आणि सर्जनशील लेखनाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य प्रमोद मोहरकर सर व उपप्राचार्या मुळे मॅडम यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी घेतलेली उत्स्फूर्त मुलाखत. विद्यार्थ्यांनी राऊत सरांना त्यांच्या पहिल्या कवितेपासून साहित्य प्रवास, प्रेरणास्रोत, कविता लेखनाची आवड कशी निर्माण झाली, तसेच कविता लिहिण्याची प्रेरणा कशी मिळवावी अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले.
प्रश्नांना उत्तर देताना संदीप राऊत सरांनी आपल्या जीवनातील अनेक प्रेरणादायी आठवणी सांगितल्या. त्यांनी चौथी इयत्तेत असताना पहिली कविता लिहिल्याचे सांगितले. त्या वेळी रत्नपारखी मॅडम यांनी दिलेले प्रोत्साहन आणि वडिलांनी जपून ठेवलेली त्यांची पहिली कविता यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
कविता ही दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टींमधूनही जन्म घेते, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी शाळेच्या आवारातील एका झाडाचा प्रत्यक्ष उदाहरण म्हणून वापर करत जागेवरच कविता कशी सुचू शकते, याचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्य व सर्जनशील लेखनाविषयी उत्सुकता आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बांगळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गायकवाड मॅडम व नलावडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. वालके मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात साहित्याची आवड आणि सर्जनशीलतेची प्रेरणा रुजवणारा ठरला.

संपादक : राहुल गवई
