अंशकालीन विनाअनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानास मंजुरी; आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित
अंशकालीन विनाअनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानास मंजुरी; आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित
मुंबई/बुलढाणा, प्रतिनिधी : अंशकालीन विनाअनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उर्वरित प्रलंबित मागण्यांवर लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. टप्पा अनुदान मंजूर झाल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागणीला न्याय मिळाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
दरम्यान, अंशकालीन विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा येथे प्रा. डी. एस. लहाने यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. आंदोलनाच्या काळात त्यांनी शिक्षकांच्या लढ्याला नैतिक बळ देत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका मांडली होती.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उर्वरित मागण्यांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने शिक्षकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, त्या मागण्यांवरही लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संपादक : राहुल गवई
