शिक्षकांच्या हक्कासाठी प्रा. डी. एस. लहाने मैदानात; शासनाला दिला इशारा
शिक्षकांच्या हक्कासाठी प्रा. डी. एस. लहाने मैदानात; शासनाला दिला इशारा
बुलढाणा | प्रतिनिधी
अंशतः अनुदानित शाळांना नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान तातडीने मंजूर करावे, या प्रमुख मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला शिवसाई परिवाराचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुलढाणा जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख तथा शिक्षक मतदार संघ अमरावती विभागाचे नेते प्रा. डी. एस. लहाने यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रा. लहाने यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून शिक्षकांच्या न्याय्य मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. शासनाने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न केल्यामुळे हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“शिक्षकांना त्यांच्या हक्कासाठी पावसात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान मंजूर करावे, अन्यथा शिक्षकांच्या लढ्याला आणखी तीव्र स्वरूप प्राप्त होईल,” असा इशारा प्रा. डी. एस. लहाने यांनी दिला.
शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व शिवसाई परिवार कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही प्रा. लहाने यांनी व्यक्त केला.

संपादक : राहुल गवई
