पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्याचा आरोप; २ नोव्हेंबरला उपोषणाचा इशारा
पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्याचा आरोप; २ नोव्हेंबरला उपोषणाचा इशारा
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जाफराबाद शाखेतील व्यवस्थापकांच्या भूमिकेविरोधात शेतकरी आक्रमक; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार
जाफराबाद (जि. जालना) : शासनाच्या निकषांनुसार पीक कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत स्टेट बँक ऑफ इंडिया, जाफराबाद शाखेच्या व्यवस्थापकांविरोधात उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाफराबाद शहर अध्यक्ष तथा वकील संघाचे तालुकाध्यक्ष अॅड. विनोद श्रीराम डिगे यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, जाफराबाद तालुक्यातील आरदखेडा येथील शेतकरी शोभाबाई शालिकराम दांडगे, शालिकराम उत्तम दांडगे आणि रवी देवराव दांडगे हे शासनाच्या निकषांनुसार कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, संबंधित शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा केल्यानंतरही त्यांना पीक कर्ज मिळणार नसल्याचे शाखा व्यवस्थापकांकडून सांगण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शेतीच्या हंगामात पीक कर्ज मिळणे अत्यंत महत्त्वाचे असताना पात्र शेतकऱ्यांना कर्जासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पीक कर्ज न मिळाल्यास शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
२ नोव्हेंबरला तहसील कार्यालयात उपोषण
पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित बँक व्यवस्थापकांच्या भूमिकेची चौकशी करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास २ नोव्हेंबर २०२६ रोजी जाफराबाद तहसील कार्यालय येथे शोभाबाई शालिकराम दांडगे, शालिकराम उत्तम दांडगे आणि रवी देवराव दांडगे हे उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अॅड. विनोद श्रीराम डिगे यांनी केली आहे.

संपादक : राहुल गवई
