शिक्षण-प्रशिक्षण

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ : प्रा. डी. एस. लहाने यांचा बार्शीटाकळी तालुक्यात शिक्षकांशी संवाद; शिक्षकांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत न्याय देण्याची ग्वाही…


अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ : प्रा. डी. एस. लहाने यांचा बार्शीटाकळी तालुक्यात शिक्षकांशी संवाद; शिक्षकांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत न्याय देण्याची ग्वाही

 

बार्शीटाकळी (जि. अकोला) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार प्रा. डी. एस. लहाने यांनी आज अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेट देत शिक्षक मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या अडीअडचणी, शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न तसेच विविध प्रलंबित मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या.

संवादादरम्यान प्रा. लहाने म्हणाले की, “शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांना शासन स्तरावर प्रभावीपणे मांडले जावे आणि विधानपरिषदेत त्यांचा बुलंद आवाज बनून काम करावे, हा माझा निर्धार आहे.” त्यांनी शिक्षकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचीही ग्वाही दिली.

भेटीदरम्यान शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित संस्थांचे प्रश्न, सेवाशर्ती, पदोन्नती, मंजुरी, वेतन, निवृत्तीविषयक अडचणी तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत आपली मते मांडली. प्रा. लहाने यांनी प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने नोंद घेत शिक्षकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे आश्वासन दिले.

प्रा. लहाने यांच्या या संपर्क दौऱ्याला शिक्षक मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष भेटीत त्यांचे स्वागत करत सकारात्मक भावना व्यक्त केल्या. शिक्षकांशी थेट संवाद साधण्याची त्यांची भूमिका आणि प्रश्न सोडविण्याची बांधिलकी यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अमरावती विभागातील प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचून त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेण्याचा हा संवाद दौरा पुढील काळातही सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


SHIVSAI DARPAN

संपादक : राहुल गवई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *